छत्रपती संभाजीनगर | दि.१२ : पुन्हा त्याच जल्लोषात आणि त्याच उत्साहात युवामित्र फौंडेशन च्या वतीने मराठवाड्यातील १३ वा स्वाभिमानी सोहळा “देश मेरा रंगीला” या आंतर शालेय, महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धा सोमवारी (दि.१०) संत एकनाथ रंगमंदिरात विद्यार्थी स्पर्धकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडली. विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंतांनी तेरा हिमालय आकाश छु ले, बहेती रहे तेरी गंगा…मिट्टी के बेटे… संदेसे आते है…मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन…मेरा रंग दे बसंती चोला….वंदे मातरम…ए वतन मेरे आबाद रहे तू… देश मेरे… सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हमपे डालो… सबसे आगे होंगे हिंदुस्थानी…ऐ वतन आबाद रहे तू… दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिये अशी देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या गीतावर गीत गायन, नृत्य सादरीकरण करून “देश मेरा रंगीला” या स्पर्धेत तरुणाईचा जल्लोष दिसून आला. यावेळी एकात्मता, बंधुता, तसेच देशभक्तीत उर्जा निर्माण करणाऱ्या विविध नृत्य अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

युवामित्र फाउंडेशन निर्मित व लाईव्ह महाराष्ट्र मराठी प्रस्तुत छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका “देश मेरा रंगीला” या स्पर्धेचे उदघाटन माजी महापौर नंदकुमार घोडेले, प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे,प्राचार्य सुनील वाकेकर, भारत कल्याणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. युवामित्र फौंडेशन चे अध्यक्ष व संयोजक सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. भारतीय कला, साहित्य, सांस्कृतिक, नाट्य, सिनेमा, व क्रीडा, क्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील कलावंतांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये युवा गायक स्वराज सरकटे, सोशल मिडिया इंफ्ल्युन्सर आर्या दाभाडे, उद्योजिका अनु चव्हाण, संदीप गायकवाड, यांना गौरविण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करतांना माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, देशभक्ती आणि देशप्रेम मना-मनात रुजवणारा हा स्पर्धा कार्यक्रम आदर्श ठरला आहे. युवा मित्र फौंडेशन ने गेल्या १२ वर्षापासून या कार्यक्रमाचे सातत्य ठेवल्याने प्रत्येक विद्यार्थी कलावंतामध्ये चांगले संस्कार रुजत असून प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळत आहे. आगामी काळात या स्पर्धा कार्यक्रमाचे स्वरूप व्यापक होईल असा विश्वास निर्माण करत त्यांनी विद्यार्थी कलावंताना शुभेच्छा दिल्या. तर गायक प्रमोद सरकटे यांनी देशभक्तीचे गीत गाऊन आपली देशभक्तीची भावना व्यक्त केली. तर प्राचार्य सुनील वाकेकर, अर्थ विषयक अभ्यासक डॉ.डी. एस काटे, रामराज्य ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष राम मुळे, शुभम डमाळे, यांनीही उपस्थित राहून या कार्यक्रमाचे आयोजक सचिन लिला सुखदेव अंभोरे यांचे अभिनंदन केले. विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रत्येक विजेत्या स्पर्धक व संघास स्मृतिचिन्ह तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विशेष रंगभूषा, उत्कृष्ट सादरीकरण यामध्ये विशेष पारितोषिके देण्यात आली. गीत गायन स्पर्धेचे परीक्षण मनोज पाटोळे यांनी तर नृत्य स्पर्धेचे परीक्षण अर्जुन टाक, निकेश म्हस्के, स्नेहा यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सद्दाम शेख यांनी केले. “देश मेरा रंगीला’’ या आंतर शालेय, महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केंद्र, भारत सरकार, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका, वेब न्युज लाईव्ह महाराष्ट्र मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन ठोकळ, नितीन अंभोरे, भास्कर निकाळजे, जया दणके, आनंद अंभोरे, अजय भिवसने, अभिजित गवळी, अमोल मगरे, आकाश ठोकळ, अभिजित तुरेराव, अमोल रोडसमुद्रे, प्रेम बोबडे, यांनी परिश्रम घेतले.

कला सन्मान देऊन गौरव….
भारतीय स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून युवामित्र फौंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा कार्यक्रमात कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, उद्योग तसेच रंगभूमीवरील कलावंतांचा यावेळी कला सन्मान देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रसिद्ध युवा गायक स्वरराज सरकटे, सोशल मिडिया इंफ्ल्युन्सर आर्या दाभाडे, उद्योजिका अनु चव्हाण, अभिनेता संदीप गायकवाड (गरीबो का अमिताभ बच्चन) गायक सुमेध मोरे, यांचा गौरव करण्यात आला. यावेळी फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेतील प्रथम उपविजेत्या राजनंदिनी पवार यांनी व्हीडीओद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्व स्पर्धकांना “भारता माता कि जय” म्हणत शुभेच्छाचा जयघोष केला.
“देवा श्री गणेशा” नृत्य स्पर्धेचे आयोजन
युवामित्र फौंडेशन व लाईव्ह महाराष्ट्र मराठी च्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचा “राज्योत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून गणेशोत्सवात “देवा श्री गणेशा” या भक्तिमय राज्यस्तरीय महोत्सव नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लोकपरंपरा नव्या पिढीत जोपासावी या उद्देशाने मराठवाड्यातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव यावेळी सादर करण्यात येणार आहे. या महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्सव साजरा करण्यासाठी सर्व कलावंतानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी युवामित्र फौंडेशन चे अध्यक्ष सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी केले आहे.
