लाईव्ह महाराष्ट्र मराठी न्युज नेटवर्क | दि. १९
छत्रपती संभाजीनगर | हिंदू धर्मात तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चातुर्मासाची सांगता होऊन याच दिवसापासून लग्नसराई आणि सर्व शुभकार्यांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी भक्तीभावाने तुळशी विवाह सोहळा पार पडणार आहे. तुळशी विवाह शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रबोधिनी (कार्तिकी) एकादशीपासून सुरू होत असून, बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक पौर्णिमेला समाप्त होईल. वैदिक पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला तुळशी माता आणि भगवान विष्णू यांच्या शाळिग्राम स्वरूपाचा विवाह लावला जातो. यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह प्रदोष काळात (संध्याकाळी सूर्यास्तानंतर) करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०५:५२ ते ०८:२६ हा प्रदोष काळ सर्वात उत्तम आहे.

काय आहे पद्म पुराणातील कथा
पद्मपुराणातील कथेनुसार, जालंधर राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी वृंदेचे पतिव्रत भंग केले होते. तेव्हा वृंदेने विष्णूंना दगड म्हणजे (शाळीग्राम) होण्याचा शाप दिला होता. पुढे वृंदेने सती गेल्यावर तिच्या राखेतून तुळशीचे रोप उगवले आणि विष्णूंनी तिला वरदान दिले की, शाळीग्राम स्वरूपात माझा विवाह तुझ्याशीच होईल आणि तुझ्या पत्राशिवाय माझा नैवेद्य स्वीकारला जाणार नाही. तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर बाजारपेठांमध्ये ऊस, झेंडूची फुले, आंब्याची पाने, आवळे, चिंच, बोरं आणि पूजेचे साहित्य दुकान आता दिसू लागली आहेत. घराघरांत तुळशी वृंदावनाला रंगरंगोटी करून आकर्षक रांगोळ्या आणि रोषणाईने सजवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
मुख्य तिथी आणि वेळ :
- मुख्य दिवस: शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६
- द्वादशी तिथी प्रारंभ: २१ नोव्हेंबर सकाळी ६:३१ / ६:३२ वाजता
- द्वादशी तिथी समाप्त: २२ नोव्हेंबर पहाटे ४:५६ / ४:५७ वाजता
- शुभ मुहूर्त: सायंकाळी प्रदोष काळ / गोधूली मुहूर्तावर (सुमारे सायंकाळी ५:२५ नंतर; स्थानिक पंचांगानुसार वेळ तपासावी).
- पारंपरिक विधी आणि महत्त्व
- तुळशी वृंदावन स्वच्छ करून रांगोळी काढली जाते आणि तुळशीला साडी, बांगड्या, हळद-कुंकू व फुलांनी सजवले जाते.
- तुळशीभोवती उसाचा मंडप उभारून शेजारी भगवान विष्णूंचे शालिग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली जाते.
- गणपती पूजनानंतर अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात आणि अक्षता टाकून विवाह सोहळा पूर्ण होतो.
- तुळशी विवाहानंतर शुभकार्ये आणि लग्नसराईला सुरुवात होते, असे मानले जाते.