लाईव्ह महाराष्ट्र मराठी न्युज नेटवर्क | दि. १९
छत्रपती संभाजीनगर | महापालिकेच्या कचरा प्रकल्पांमध्ये अग्निसुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून हजारो टन कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या हर्सूल येथील प्रकल्पातीच्या ड्राय वेस्ट विभागाला बुधवारी (१८ नोव्हेंबर) पहाटे लागलेल्या आगीत सुमारे अडीच हजार टन कचरा जळून खाक झाला आहे. महापालिकेच्या हर्सूल, पडेगाव आणि चिकलठाणा या तिन्ही कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये फायर अलार्म यंत्रणाच नसल्याची माहिती पुढे आली आहे. या आगीमुळे कचरा वर्गीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या बेलींग आणि प्री सॉटिंग मशीनचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला शेडची पत्रे काढावी लागली. या घटनेमुळे कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेल्या या प्रकल्पांच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हर्सूल-सावंगी रस्त्यालगत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील ड्राय वेस्ट सेक्शनमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

सुरुवातीला आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास आगीने मोठे स्वरूप धार केले. प्लास्टिक, कागद, कपडे आणि मिश्र कचऱ्याचा मोठा साठा असल्याने आग वेगाने पसरली. कचऱ्याच्या ढिगांमधून आणि शेडमधून धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना थेट आगीपर्यंत पोहोचण्यात अडचणी आल्या. अखेर अग्निशमन दलाच्या गाड्या डेपोच्या मागील बाजूने आत नेण्यात आल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने शेडची पत्रे काढण्याचा निर्णय घेतला. पत्रे काढल्यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न अधिक वेगाने करण्यात आले. प्रकल्पातील ७५ लाख लिटर पाणीसाठा असलेल्या हौदातून पाणीपुरवठा करण्यात आला. याशिवाय ७० ते ८० हून अधिक खासगी टँकरची मदत घेण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतरही सायंकाळी चार वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्यांमधून पाण्याचा मारा सुरू होता. सायंकाळपर्यंत परिसरात ध्राचे लोट कायम होते.
फायर अलार्म असता तर वेळीच माहिती मिळाली असती?
हॉटेल, रुग्णालये, व्यावसायिक आस्थापना आणि शासकीय इमारतीमध्ये अग्निसुरक्षेसाठी फायर डिटेक्टर आणि अलार्म यंत्रणा बसविण्यावर भर दिला जातो. मात्र, ज्वलनशील प्लास्टिक, कागद, कपडे आणि मिश्र कचऱ्याचा हजारो टन साता असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्येच फायर अलार्म यंत्रणा नसल्याची बाब या घटनेतून समोर आली आहे. हर्सल प्रकल्पात पहाटे आग लागल्यानतर ती मोठ्या प्रमाणावर पसरली. फायर अलार्म यंत्रणा असती तर आगीची माहिती तत्काळ मिळून सुरुवातीलाच नियंत्रण मिळविण्यास मदत झाली असती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील तिन्ही प्रकल्पांमध्ये अशी यंत्रणा नसल्याने भविष्यात अशा घटना घडल्यास त्यावर वेळीच नियंत्रण कसे मिळविणार, हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. चिकलठाणा आणि हर्सल या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले, महापौर, उपमहापौर आणि सभापती यांनीही दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेत यंत्रणेला सूचना दिल्या. नगरसेवक राजगौरव वानखेडे हे सकाळपासून घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यात सहभागी झाले.
दररोज संकलन केला जातो ६५० टन कचरा
शहरातून दररोज सुमारे ६५० मेट्रिक टन कचरा संकलित होतो. त्यापैकी पड़ेगाव, हर्सल आणि चिकलठाणा या तीन प्रकल्पांमध्ये प्रत्येकी सुमारे २१० मेट्रिक टन कचरा पोहोचतो. मात्र, प्रत्येक प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता सुमारे १५० मेट्रिक टन आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक कचरा प्रकल्पांमध्ये येत असून, प्रक्रिया होण्यास विलंब लागतो आणि कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. शहरातील कचऱ्यामध्ये दररोज सुमारे ३५० मेट्रिक टन ओला, १०० ते १२५ मेट्रिक टन सुका आणि जवळपास १०० मेट्रिक टन मिश्र कचरा असतो. वाढत्या कचऱ्याच्या तुलनेत प्रक्रिया क्षमता आणि साठवणुकीचे नियोजन पुरेसे आहे का, हा प्रश्न या घटनेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
फायर ऑडिट करण्याचे आदेश
आगीच्या घटनेनंतर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त नंदकुमार भोंबे आणि उपायुक्त अंकुश पांढरे उपस्थित होते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नारेगाव, पडेगाव, हर्सूल येथील प्रकल्पाचे फायर ऑडीट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत.