#सचिन लिला सुखदेव अंभोरे | दि. ११ :
छत्रपती संभाजी नगर | गेली अनेक वर्ष आवश्यक असलेल्या कागद पत्रांसाठी धावा-धाव करूनही हाती निराशा आल्याने हतबल झालेले आई-वडील गुरुवारी (दि. ११) थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे आपली कैफियत मांडली. संपूर्ण दिव्यांग असलेली मोहिनी हिची अवस्था आणि तिच्या आई वडिलांची परिस्थिति पाहून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तातडीने आदेश करत संपूर्ण प्रशासनाला कामाला लावले. याबाबतचे गांभीर्य ओळखत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने यांनी प्रशासनाशी संपर्क साधत अवघ्या काही तासांतच मोहिनीला “आधार” कार्ड मिळवून दिले. १५ वर्षानंतर आधार कार्ड मिळाल्याने मोहिनी व तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद यावेळी दिसून आल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाची कार्यतत्परता आणि दिव्यांग आघाडीचे सुरेश माने यांची समयसूचकता यावेळी दिसून आली.
पैठण तालुक्यात असलेल्या अंतरवाली खांडी या गावात हरिभाऊ डीघूळे आणि ध्रुपताबाई डीघूळे हे आपल्या तीन मुले आणि एक मुलगी मोहिनी यांच्यासोबत राहतात. मोलमजुरी करून आपला उदारनिर्वाह करणाऱ्या हे कुटुंब संपूर्ण दिव्यांग असलेल्या वीस वर्षीय मोहिनीचे जबाबदारीने संगोपन करतात. तसेच वेळोवेळी तिचे जेवण, औषधी, आरोग्य तपासणी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरतही करतात. मोहिनी ही संपूर्ण दिव्यांग असल्याने तिचे आधार नोंद करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. गेली अनेक वर्षे ग्रामीण आणि शहरी आई – वडिलांना शहरी व ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयात मोहिनीच्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मूळ कागद पत्रे जमा करण्यासाठी खस्ता खात आपल्या चपला झिजवाव्या लागल्या. शासकीय नियमानुसार आधार नोंदणी साठी हातांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन, तसेच इतर बाबी आवश्यक असल्याने मोहिनीच्या दिव्यांग अवस्थेमुळे त्या शक्य होत नव्हत्या. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी अधिकाऱ्यांनी चार ते पाच तास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारातच प्रयत्नांची पराकाष्टा केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अनेक अभ्यागतांचे मन मोहिनीच्या दिव्यांग अवस्थेने हेलावून गेले.
मात्र या परिस्थितीची छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी प्रशासन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने हे पुणे दौऱ्यावर असताना सुद्धा त्यांचे सहकारी मित्र जय वऱ्हाडे पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क केला. आणि माने यांनी गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोहिनी ला मदत करण्यासाठी विनंती केली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर, वैद्यकीय कक्षाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश लड्डा आणि तातडीने सूत्रे हलवत मोहिनी ला “आधार” कार्ड नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत मान्यता असलेल्या आधार केंद्राचे संचालक जय वऱ्हाडे यांनी त्यांचे आधार केंद्र ऑपरेटर रूपाली संदीप हजारे, अरबाज खान, साहिल बिडलान यांच्या मदतीने चार ते पाच तासांच्या अथक परिश्रमाने मोहिनीला अखेर “आधार” कार्ड ची यशस्वी नोंदणी करून दिली. मोहिनीची आधार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर अनेक वर्षाचे कष्ट तिच्या आई आणि वडिलांच्या डोळ्यात अश्रु रूपाने तरळत होते. जिल्हाधिकारी प्रशासनाने दाखवलेली कार्य तत्परता खऱ्या अर्थाने मोहिनी सारख्या अनेक दिव्यांग कुटुंबांना मायेचा “आधार” देणारी ठरली. मोहिनी च्या घरची परिस्थिति अत्यंत हलाखीची असल्याने मोहिनीला उपचार करण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाला “आधार” देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीच्या एका मदतीच्या हाताची गरज आहे एव्हढीच यानिमित्ताने अपेक्षा याठिकाणी अधोरेखित करावी वाटते.