लाईव्ह महाराष्ट्र मराठी | दि.१२
छत्रपती संभाजीनगर | गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढगांची वर्दळ वाढली असली तरी पाऊस मात्र अद्याप झालेला नाही. हवामानातील बदल आणि वातावरणातील विशिष्ट घडामोडींमुळे ढग पश्चिमेकडे वाहत असून ते अधिक उंचीवर जात आहे. त्यामुळे परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी पावसासाठी आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती अद्याप तयार झालेली नाही. अशीच परिस्थिती काही दिवस राहील. त्यामुळे मराठवाड्याला पावसाची यंदा चांगलीच प्रतीक्षा करावी लागत आहे. १८ ते २० जूनपर्यंत पाऊस येईल. असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे.
काय आहे वातावरण?
सध्या सकाळपासूनच आकाशात ढगांचे प्रमाण वाढलेले दिसते. दुपारनंतर वातावरणात उकाडा आणि दमटपणा जाणवत असला तरी पावसाच्या सरी कोसळत नाहीत. यामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत. विशेषतः खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीसाठी त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मराठवाड्यात मान्सूनच्या आगमनाबाबतही उत्सुकता वाढली आहे. हवामानातील सध्याची स्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काय आहे हवामानाचा अंदाज?
अधूनमधून हलक्या सरी काही भागांत पडू शकतात; मात्र व्यापक आणि समाधानकारक पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात १८ ते २० जूनदरम्यान पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनेक जिल्ह्यांत मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होऊ शकतो. असा अंदाज वर्तविला जात असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी घाईगडबडीत निर्णय न घेता पुढील हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी…
खरीप हंगामाची तयारी बहुतांश शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. बियाणे, खते आणि मशागतीची कामे उरकून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरणीचे नियोजन पुढे ढकलावे लागत आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पेरणी उशिरा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.