लाईव्ह महाराष्ट्र मराठी | दि.१७
छत्रपती संभाजीनगर | ६१ व्या फेमिना मिस इंडिया सौन्दर्य स्पर्धेत प्रथम उपविजेत्या कु.राजनंदिनी सोनाली मंगलसिंग पवार” यांच्या वतीने बीड बायपास येथील भगवान बाबा बालिका अनाथ आश्रमातील मुला-मुलींसाठी सामाजिक व सेवा भावनेने मंगळवारी (दि. १९) रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला “राजा शिवाजी” या मराठी चित्रपटाच्या शो चे आयोजन दुपारी १ वाजता प्रोझोन मॉल च्या आयनॉक्स चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी आणि प्रेरणेने मी आपल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जागतिक पातळीवरच्या व्यासपीठावर करू शकले. मी छत्रपती संभाजीनगर ची असल्याने याचा मला सार्थ अभिमान आहे. या शहरातील प्रत्येक व्यक्तींनी मला प्रेम देऊन मला सहकार्य केले. आणि म्हणूनच आपणही सामाजिक भावना जोपासत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक मुला-मुलींमध्ये आणि येणाऱ्या पिढीत रुजवावे आणि त्यांना प्रेरणा मिळावी या उदात्त व सामाजिक भावनेने या चित्रपटाच्या शो चे आयोजन करण्यात आल्याचे राजनंदिनी पवार यांनी स्पष्ट केले. अनाथ मुला-मुलींना सर्वासामान्य माणसासारखे जगता यावे, त्यांना आपल्यासारखेच आनंदाचे क्षण जगता यावे यासाठी मी माझ्या वतीने अल्पसा प्रयत्न करत असल्याचे राजनंदिनी पवार म्हणाल्या. त्यांच्या अंगी शिवरायांचे विचार रुजल्यास येणाऱ्या पिढीत देशभक्ती, सामाजिक कर्तव्य तसेच चांगले विचार, संस्कार रुजतील असा विश्वास मला वाटत असल्याने मी सामाजिक भावनेतून “राजा शिवाजी” या मराठी चित्रपटाच्या शो चे आयोजन केल्याचे राजनंदिनी पवार म्हणाल्या. शिवरायांच्या विचारांनी आणि माझी आई सोनाली पवार, वडील मंगलसिंग पवार यांच्या संस्कारामुळे हा एक सामाजिक प्रयत्न मी अनाथ मुला-मुलींसाठी करतेय याचे समाधान वाटत असल्याचे ६१ व्या फेमिना मिस इंडिया सौन्दर्य स्पर्धेत प्रथम उपविजेत्या कु.राजनंदिनी सोनाली मंगलसिंह पवार” यांनी स्पष्ट केले.