छत्रपती संभाजीनगर: बीड बायपास रोड येथील अॅडव्हान्स मेडिसिटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत भव्य सर्वरोग मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ३०० रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री श्री. अतुल सावे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे शहराध्यक्ष श्री. किशोर शितोळे उपस्थित होते. तसेच नगरसेविका सविता कुलकर्णी, नगरसेविका शिल्पाताई वाडकर, नगरसेवक चंद्रकांत हिवराळे, समाजसेवक श्री. प्रदीप बुरांडे, समाजसेवक श्री. बाबुराव नरवाडे तसेच उद्योजक श्री. गौतमदादा डोंगरदिवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना श्री. अतुल सावे यांनी ग्रामीण व सर्वसामान्य भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या रुग्णालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ रुग्णांना मिळवून देण्यासाठी रुग्णालयाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी अभिनंदन केले. या शिबिरामध्ये विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन केले. डॉ. आनंद भुक्तर, डॉ. मनोज भुक्तर, डॉ. विनोद भुक्तर, डॉ. अनुजा भुक्तर, डॉ. प्रजा भुक्तर, डॉ. सिद्धिविनायक राजमाने आणि डॉ. कपिल पाटील यांनी रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद पाटील, श्री. संजय फिरके, श्री. पवन वाघमारे तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश नागरे यांनी केले.